मुंबई पोलिसांकडे सात महिन्यांत 32 धमकीचे कॉल

>> आशीष बनसोडे 

 ‘पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा निनावी कॉल’ अशा बातम्या अधेमधे धडकत असतात. या वर्षी जरा अशा धमकीच्या कॉलची संख्या जास्त दिसते. गेल्या सात महिन्यांत पोलिसांना तब्बल 32 धमकीचे कॉल आले. विशेष म्हणजे या एकाही कॉलमध्ये काहीच तथ्य आढळून आलेले नाही. 32 पैकी 17 कॉलर्सना अटक करण्यात आली असून 15 कॉल प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

दहशतवादी हल्ला होणार आहे, अमूक ठिकाणी बॉम्बस्पह्ट होणार आहे, दहशतवादी घुसलेत अशा स्वरूपाचे धमकीचे पह्न पोलीस नियंत्रण कक्ष आणि ट्विटर हॅण्डलवर मेसेज करून देण्यात येतात. गेल्या सात महिन्यांत आलेल्या 32 कॉलपैकी 26 कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आले. 7 जानेवारीला पहिला कॉल आला, तर 6 ऑगस्टला 32 वा कॉल आला.  वरिष्ठ अधिकाऱयाला व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचा कॉल करण्यात आला. वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱयाकडेही धमकीचा मेसेज पाठविण्यात आला होता.  यामध्ये काही कॉलर मनोरुग्ण निघाले, काहींनी दुसऱयाचा राग धमकीचा पह्न करून काढला, तर काहीनी दारूच्या नशेत कॉल केले. एकाने तर आत्महत्या करत असल्याचा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलानेदेखील धमकीचा कॉल केला होता. अशा प्रकारे खोडसाळपणा किंवा राग काढणाऱया 17 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, तर 15 कॉलमध्ये आक्षेपार्ह असे काही आढळून आलेले नसले तरी त्या कॉल्सच्या संबंधीची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, 32 पैकी एकाही कॉलमध्ये गंभीर असे काहीच आढळून आले नसले तरी विनाकारण घबराटीची परिस्थिती निर्माण होऊन पोलीस यंत्रणा नको त्या कामाला लागली. वर्ष 2021 मध्ये 18, तर वर्ष 2022 मध्ये 15 धमकीचे कॉल आले होते. या तुलनेत चालू वर्षाच्या सात महिन्यांतच 32 धमकीच्या कॉलची नोंद झाली आहे.

तार्किक निष्कर्ष येईपर्यंत तपास होतो 

मुंबई पोलीस दलासाठी अद्ययावत असे नियंत्रण कक्ष असून येथे येणाऱया प्रत्येक कॉलची संवेदनशील दखल घेतली जाते. नियंत्रण कक्षाला कोणताही कॉल आल्यानंतर पाच ते सहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतात. आमच्या सर्व यंत्रणा लगेच सतर्क होऊन आवश्यक कारवाया करतात. संबंधिताची माहिती काढून चौकशी सुरू केली जाते. तार्किक निष्कर्ष येईपर्यंत तपास केला जातो. खोडसाळपणे अथवा घबराट पसरविण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी कॉल केला असल्यास कठोर कारवाई करण्यात येते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नागरिक आमचे कान आणि डोळे

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण नागरिक हे आमचे कान आणि डोळे आहेत. त्यामुळे आजूबाजूला किंवा आपल्या शहरात काही आक्षेपार्ह घटना घडणार असतील अथवा घडत असतील आणि ते जर लक्षात आले तर त्या वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधायला हवा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी सांगितले.