बादलीत बुडवून प्रेयसीला ठार मारले, बायकोच्या मदतीने गुजरातला जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली

चित्रपटसृष्टीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करीत असलेल्या २९ वर्षीय तरुणीची तिच्याच विवाहित प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नयना महंत असे हत्या झालेल्या आर्टिस्टचे नाव असून ती एक महिन्यापासून बेपत्ता होती. मनोहर शुक्ला (४३) याने तिला ठार मारून मृतदेह गुजरातमधील वलसाडच्या खाडीत फेकला. पोलिसांनी या संपूर्ण हत्येचा छडा लावला असून शुक्ला याच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक महिन्यापासून ही मेकअप आर्टिस्ट तरुणी गायब झाली होती. तिची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

पाण्यात बुडवून मारले
नयना महंत ही मूळची वसईची असून ती गेल्या काही दिवसांपासून नायगावमधील सनक इमारतीत एकटीच राहत होती. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता झाली होती. तिचा फोन बंद असल्याची तक्रार बहीण जया हिने पोलिसांकडे केली. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता आरोपी मनोहर शुक्ला हा सुटकेस घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यासोबत त्याची पत्नीदेखील होती. यावरून पोलिसांनी आज त्याला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे यांनी दिली. मनोहरला त्याची बायको पूर्णिमा हिने नयनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. मनोहर आणि पूर्णिमाने नयनाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून 150 किलोमीटरचे अंतर स्कूटरवरून पार केले होते. गुजरातमधील वलसाडजवळच्या एका खाडीत त्यांनी नयनाचा मृतदेह फेकून दिला होता. मनोहर आणि पूर्णिमाने मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्यांना 2 वर्षांच्या मुलीलाही सोबत नेले होते.

चित्रपटसृष्टीमध्ये मनोहर शुक्ला हादेखील काम करतो, तर नयना महंत ही मेकअप आर्टिस्ट असल्याने तिची मनोहरबरोबर ओळख झाली. त्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांचेही अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कालांतराने मनोहर हा विवाहित असल्याचे समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. एवढेच नव्हे तर नयना हिने मनोहर शुक्ला याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी नयनावर वारंवार दबाव टाकत होता. त्यातूनच त्याने नयना हिला पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ही सुटकेस त्याने वलसाडमध्ये फेकून दिली.