340 रुपयांची बीअर पडली 24 हजारांना

894

ऑनलाइन बीअर मागवण्याच्या नावाखाली एका तरुणाची 24 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार तरुण हा कांदिवली परिसरात राहतो. तो ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी दोन पेमेंट ऍपचा वापर करतो. गेल्या आठवडय़ात त्याला बीअर खरेदी करायची होती. त्याने बीअरच्या दुकानाचा नंबर ऑनलाइन शोधला. ऑनलाइन मिळालेल्या एका नंबरवर तक्रारदाराने फोन केला. फोन केल्यावर समोरील व्यक्तीने बीअर आणण्यासाठी 340 रुपये ऑनलाइन भरावे लागतील. त्यानंतर बीअर घरपोच केली जाईल अशा भूलथापा मारल्या. तक्रारदारांनी त्यावर विश्वास ठेवला.

व्हॉटस्ऍपवर आलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तक्रारदाराच्या खात्यातून 12 हजार 345 रुपये काढले गेले. पैसे गेल्याचे समजताच तक्रारदाराने विचारणा केली तेव्हा चुकून पैसे वजा झाले. पुन्हा एक मेसेज येईल. तो आल्यावर सर्व पैसे खात्यात जमा होतील असे तक्रारदाराला सांगण्यात आले. दुसऱयांदा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर पुन्हा खात्यातून पैसे काढले गेले. फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात येताच त्याने एका वाईन शॉपमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा त्या वाईन शॉपमध्ये घरपोच बीअरची सुविधा नसल्याचे त्याला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याप्रकरणी त्याने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या