कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, दिवसभरात राज्यात 43 तर मुंबईत 35 रुग्ण; आतापर्यंत चौघांचा मृत्यू

राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात राज्यात 43 रुग्ण सापडले तर त्यापैकी 35 रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघे जण मुंबईतले सहव्याधी असलेले रुग्ण होते. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्यांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, संशयास्पद वाटल्यास चाचण्या कराव्यात, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईत जानेवारीपासून कोरोनाचे पुन्हा रुग्ण सापडू लागले असून आतापर्यंत मुंबईत 300 रुग्ण सापडले आहेत. त्यात गेल्या आठवड्यात केईएममध्ये दोन सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांसह तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 112 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून बाधितांवर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध असून लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

देशात 24 तासांत दोघांचा मृत्यू
देशभरातील विविध राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासांत दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूमध्ये एका 84 वर्षांच्या वृद्धाचा तर ठाण्यात 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या खालोखाल तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली या राज्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत.

मुंबईत मे महिन्यात रुग्णसंख्या वाढली
मुंबईत जानेवारीपासून कोरोना रुग्ण सापडत आहेत. जानेवारीत एक, फेब्रुवारीत एक, मार्चमध्ये शून्य, एप्रिलमध्ये चार तर मे महिन्यांत सर्वाधित उच्चांक गाठत ही संख्या 242 वर पोहोचली. त्यामुळे आतापर्यंत एकूण 24८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आतापर्यंत 209 रुग्ण हे सक्रिय रुग्ण आहेत.

असे आढळले बाधित रुग्ण
जानेवारी ते आतापर्यंत 7,389 कोरोना चाचणी
जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 300 रुग्ण सापडले
जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत 248 रुग्ण सापडले
रविवारी 25 मे रोजी राज्यात 43 कोरोना रुग्ण सापडले