
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तिळापूर शिवारामध्ये एका विशिष्ट संसर्गजन्य रोगाने गेल्या आठ दिवसांत सुमारे 35 गायींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पुन्हा 4 गाई आणि 4 बोकडांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
गंभीर आजाराची मालिका सुरूच असल्याने शेतकरीवर्गामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती समजताच, घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्य़ांचे पथक दाखल झाले आहे. डॉ. अमर माने, डॉ. एस. एस. पालवे, डॉ. विजय धिमते, डॉ. एन. एस. मेहत्रे, डॉ. एस. ए. निकम, डॉ. डी. बी. निमसे, डॉ. अविनाश ठाकूर यांचे पथक आजारावर निदान करीत आहेत व त्यानुसार शेतकऱ्य़ांना योग्य त्या सूचना केल्या जात आहेत.
तिळापूर शिवारात गेल्या आठ दिवसांपासून अनेक शेतकऱ्य़ांच्या गायी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. तर, अनेकांच्या गायी गंभीर आजारी पडल्या आहेत. बुधवारी शेतकरी गोविंद बाचकर यांच्या तीन गाई व 4 बोकड, संदीप काकड यांची 1 गाय दगावली आहे. तर, गेल्या आठवड्यात संदीप काकड यांच्या 7 गायी, जनार्दन काकड 4 व बाबासाहेब काकड यांच्या 4 गायी, विलास गीते यांच्या 3 गायी, तात्या तमनर 3 गाई, संसर्गजन्य रोगाने दगावल्या आहेत.
त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्य़ांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येची पशुवैद्यकीय विभागाकडून तत्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करून शेतकऱ्य़ांना दिलासा द्यावा तसेच अनेकांच्या आजारी जनावरांना औषधोपचारासाठी व दगावलेल्या जनावरांना शासनस्तरावर योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
























































