
वर्गात शिकवण्यात येणाऱया प्रत्येक धडा, कविता, गणिते यांच्या नोंदी विद्यार्थ्यांना करता याव्यात यासाठी पाठय़पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यात येणार आहेत. येत्या जूनपासून ही पाठय़पुस्तके तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. ‘माझी नोंद’ या सदराखाली विद्यार्थी या पानावर नोट्स लिहू शकतील.
राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठय़पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने या पाठय़पुस्तकांमध्येच वहय़ांची पाने समाविष्ट करण्यासाठीच्या धोरणासंदर्भातील निर्णय आज जारी केला आहे. पाठय़पुस्तकांना वह्या जोडण्याची ही प्रक्रिया तूर्तास सरकारी-स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी शाळांमध्ये असली तरी खासगी संस्थांना मात्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले नाही.
- पहिली ते आठवीतील पाठय़पुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात येतील. त्यात प्रत्येक घटक पाठ कविता यानंतर वहीचे एक पान समाविष्ट करण्यात येईल.
- पहिली ते दुसरीची पाठय़पुस्तकेसुद्धा एकूण चार भागांमध्ये तयार करण्यात येतील. त्यानुसार सर्वांसाठी आवश्यक पृष्ठs समाविष्ट करण्यात येतील.
- आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठय़पुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांची एकूण चार विभागांमध्ये विभागणी केली जाईल तसेच श्रेणी व वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्र्यरीत्या उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
- झालेल्या वाढीमुळे पाठय़पुस्तकाच्या किमतीवर याचा परिणाम होणार असल्याने पुस्तके भरमसाट किमतीने विकली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


























































