
जगातील जवळपास 4 अब्ज लोकांसमोर पाण्याचे संकट उद्भवले आहे. त्यांना बारा महिने जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील दिल्ली, बीजिंग, न्यूयॉर्क आणि रिओ यांसारख्या शहरांत पाण्याचे संकट निर्माण झाले असून, हिंदुस्थानातील चेन्नई शहर तर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे, असा धक्कादायक निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात काढण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगातील 39 शहरांमधील पाण्याची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अहवालात दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता नवव्या, मुंबई बाराव्या, बंगळुरू चोवीसाव्या, तर चेन्नई एकोणतीसाव्या स्थानावर आहे. हिंदुस्थानातील हैदराबाद, सुरत आणि पुण्यासारखी शहरेही दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे पहिले शहर ठरेल, जिथे पाणी संपेल. मेक्सिको सिटीत दरवर्षी जवळपास 20 इंच पाणी खोल जात आहे. जगभरातील मोठमोठ्या नद्या, नाले आणि तलाव आटत आहेत.























































