
सामना प्रतिनिधी । नांदेड
चार चाकी वाहनातून पुण्याकडे निघालेल्या चौघाजणांचा नगरपुणे मार्गावर अपघात होऊन चौघे जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे शिरूर येथे घडली आहे. अपघातात मृत झालेले चारही जण लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथील असल्याची माहिती शिरूर पोलीस स्थानकाचे पी.एस.ओ. कोकरे यांनी दिली. या अपघातात 20 दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथील हाके कुटुंबीय पुणे येथील रायसोनी कॉलेज वाघोली येथे वास्तव्यास आहेत. आपल्या नवजात बालकाला घेऊन जाण्यासाठी पुण्यावरून आपल्या चारचाकी वाहनाने नांदेड जिल्हयात आले होते. ते शनिवारी सायंकाळी पुणे येथे निघाले असता नगर-पुणे महामार्गावर कारने माळाकडे जाणार्या चढावर एका उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. ही घटना रविवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली. या अपघातात किशोर माधव हाके वय 32, लिंबाजी उर्फ शुभम माधव हाके वय 25, विमलबाई माधव हाके वय 60 वर्ष व 20 दिवसाचे बाळ ठार झाले आहे. तर या घटनेत पुष्पा किशोर हाके वय 25, समृध्दी बजरंग हालगुडे वय 4 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एन.एम. सारंकर हे करित आहेत. या घटनेने लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथे शोककळा पसरली आहे.

























































