दुबईतील हिंदुस्थानी “सुपरबेबी” शिवानीने कॅन्सरनंतर कोरोनालाही हरवले

दुबईतील 4 वर्षीय शिवानी कोरोनाच्या भयाने हाय खाणाऱ्या  हिंदुस्थानींनाच नव्हे तर जगभरातील हताश कोरोनाग्रस्तांसाठी प्रेरणा बनलीय. आधी जीवघेण्या कॅन्सरला मात देत नंतर जगण्याच्या अपूर्व जिद्दीने कोरोनालाही हरवणारी दुबईतील शिवानी ही हिंदुस्थानी बालिका जगासाठी “सुपर बेबी” ठरली आहे. शिवानीच्या आईला आधी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर कॅन्सरमधून सावरणाऱ्या शिवानीला कोरोनाने गाठले होते. पण या भयाण रोगाला पराभूत करण्याची असीम जिद्द दाखवत ती मृत्युंजय ठरलीय.
दुबईत वास्तव्य करणाऱ्या शिवानीला गैंगलियोन न्यूरोब्लास्टोमा हा किडनीचा दुर्लभ कर्करोग झाला होता. या आजारातून बारी होण्यासाठी ती केमोथेरपीसारख्या क्लेशदायक उपचाराने ठीक झाली आहे. पण या उपचारांमुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती फारच कमी झाली आहे. त्यातच तिला कोरोनाने गाठल्याने दुबईच्या
अल फुतैतिम हेल्थ हब रुग्णालयात  ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ अल बाज हे तिच्यावर उपचार करीत होते. याच रुग्णालयात शिवानीने दुर्धर कॅन्सरला हरवले होते. पण तिची दुबळी इम्युनिटी तिच्यासाठी जिवावरचे संकट ठरू शकत होते. डॉ  अल बाज यांनी छातीवर दगड ठेवून चिमुकल्या शिवानीवर कोरोनातून बरे होण्यासाठी उपचार केले. तिला दिलेल्या औषधांचा तिच्या किडन्यांवर दुष्परिणाम होण्याची मोठी भीती डॉक्टरांना भेडसावत होती. सुमारे 20 दिवस झुंझार कोविड योद्धी शिवानी कोरोनाशी झुंजली.अखेर तिची जगण्याची अपूर्व जिगर सरस ठरली आणि “हिम्मत मर्दा तो मदद खुदा” ही म्हण खरी ठरवत शिवानी खडखडीत बरी झाली.  आतातिला 14 दिवस विलगीकरणात ठेऊन तिच्यावर रुग्णालय कर्मचारी बारीक लक्ष ठेवून आहेत. शिवानीची आई मात्र अद्याप कोरोनावर उपचार घेत आहे. त्या दुबईत वैद्यकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

4 वर्षीय शिवानीने जीवघेण्या रोगांशी दिलेली झुंज आमच्यासाठीच नव्हे तर कोरोनाच्या महामारीने हादरलेल्या जगातील नागरिकांसाठी प्रेरणा देणारीच आहे. या सुपर बेबीच्या जिद्दीला आमचा सलाम – डॉ. हैदर अल-यूसुफ
संचालक, अल फुतैतिम हेल्थ हब रुग्णालय  

आपली प्रतिक्रिया द्या