
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत जागांच्या 25 टक्के प्रवेशासाठी पालकांसाठी 17 तारखेपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिह्यात मोफत प्रवेशासाठी 400 शाळा पात्र असून, त्या ठिकाणी 3 हजार 48 विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेशाची क्षमता आहे. यासह 40 पूर्व प्राथमिक शाळादेखील पात्र असून, त्यात 10 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत शासन अधिसूचना 11 ऑक्टोबर 2011 अन्वये तयार केलेले नियम लागू करण्यात आलेले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. तसेच, अशा प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाची प्रतिपूर्ती वेळोवेळी निश्चित केलेल्या दराप्रमाणे करण्याची तरतूद आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक, सामाजिक दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटित, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. पालकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिह्यात इंग्रजी, उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळांवर मदत केंद्राची स्थापना करून या मदत केंद्राच्या माध्यमातून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. तालुकानिहाय मदतकेंद्राची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. मदत केंद्रावर अर्ज पूर्णपणे मोफत भरण्यात येतात. तसेच, ज्या पालकांना अर्ज ऑनलाइन भरणे शक्य नाही, अशा पालकांना ऍपद्वारेही ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
पालकांच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 25 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधी जिह्यातील 25 टक्के पात्र सर्व शाळांची नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच, या वर्षाची 25 टक्के कोटय़ातील प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून, पालकांनी अर्ज करून देण्यात आलेले आहे. 17 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
तालुका शाळा क्षमता
अकोले 13 115
जामखेड 12 55
कोपरगाव 24 247
कर्जत 19 117
नगर 53 301
नेवासा 31 220
पारनेर 29 153
पाथर्डी 22 136
राहुरी 29 280
राहाता 36 385
शेवगाव 34 200
संगमनेर 34 286
श्रीगोंदा 19 83
श्रीरामपूर 26 193
मनपा 27 277



























































