तारापूरमध्ये पाच वर्षांत 48 कामगारांचा बळी; 90 जण जायबंदी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

tarapur-fire

आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरची ओळख आहे. पण येथील विविध कारखान्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत तारापूर औद्योगिक केंद्रामध्ये विविध अपघातांमुळे 48  कामगारांचा बळी गेला आहे. तर 90 जण जायबंदी झाले असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

ही आहेत कारणे
यांत्रिक बिघाड, मानवी निष्काळजीपणा, अपुरे प्रशिक्षण, असुरक्षित कार्यपद्धती ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. मागील दोन वर्षांतच 17 प्राणघातक अपघात झाले असून 70 लाख 25 हजार रुपये नुकसानभरपाई आणि 29 लाख 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान मयत कामगारांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

244 जणांवर खटले
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची नियमित तपासणी केली जात नाही. देखरेखीसाठी विभागाकडे मनुष्यबळाची टंचाई. आतापर्यंत २४४ कारखान्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. प्रेशर व्हेसल, लिफ्टिंग टॅकल आदी यंत्रसामग्रींची तपासणीसुद्धा सक्षम व्यक्तीकडून करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने आग, स्फोट आणि वायुगळतीची शक्यता कायम असते. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत कारखान्यांची काटेकोर तपासणी केली जाते. – माधव तोटेवाड, सहसंचालक (औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, पालघर)