जालना – बायोडिझेल साठ्यावर पुरवठा विभागाची कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बारसवाडा फाटा येथील बायोडिझेल साठ्यावर जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी रिया बसैय्या, पुरवठा विभागाचे निरीक्षक प्रकाश जाधव, अंबड तालुका पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी केली.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दोदडगाव शिवारात बारसवाडा फाट्यावर एका धाब्याजवळ पत्र्याचे शेड मारुन तसेच जमिनीत टाकी पुरुन शेडमध्ये व रस्त्यावर असे 2 ठिकाणी बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पुरवठा विभागास कारवाई करण्याचे आदेश दिले. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर पाळत ठेवून बोगस बायोडिझेलचे टँकर (एम. एच. 04 जी.आर. 5808) या परिसरात आल्यावर त्यावर झडप घालून कारवाई करत 21 हजार लिटर बायोडिझेल, पंचवीस हजार लिटरच्या तीन लोखंडी टाक्या, दोन हजार लिटरच्या 3 प्लास्टिकच्या टाक्या, दोनशे लीटरचे 17 बॅरल, 35 लिटरच्या 15 कँनी, जनरेटर 2, बॅटरी 2, इन्वर्टर 1 व इतर साहित्य असा सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.