खासगी कार्यालयांत 50 टक्के कर्मचारी; नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाने उच्चांकी आकडा गाठला असून कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती हवी, त्याचप्रमाणे नाटय़गृहे, सभागृहांत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे संकट टळेपर्यंत ती बंद ठेवण्यात येतील. कारखाने (मॅन्युफॅक्चरिंग युनिटस्) ना पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली असली तरी नियमांचे उल्लंघन झाल्यात तेही बंद केले जातील, असे स्पष्ट निर्देश आज राज्य सरकारने दिले.

राज्य सरकारने मिशन बिगिनअंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालयप्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱयांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे. आरोग्य, अत्यावश्यक सेवा तसेच उत्पादन क्षेत्रांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. कारखान्यांमध्ये ज्या ठिकाणी उत्पादन होते त्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम करावे. कर्मचाऱयांची जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नाटय़गृहांचा उपयोग सभा, कार्यक्रमांसाठी नाही

त्याशिवाय नाटय़गृहे आणि सभागृहे यामधील उपस्थितीदेखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास ती नाटय़गृहे व सभागृहे बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशातून देण्यात आला आहे.