
नागपूर मनपा निवडणुकीसाठी 525 बसेस धावणार आहेत. उद्या महापालिकेसाठी मतदान होणार असून मतदान केंद्रापर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच निवडणूक साहित्य पोहोचविण्यासाठी 525 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 जानेवारीच्या सांयकाळी 5 वाजेपर्यंत मर्यादित मार्गावर 250 बसेस सुरू राहतील. 16 जानेवारीपासून शहरातील बस सेवा आपल्या नियमित वेळापत्रकानुसार, नियमित सुरू राहील, अशी माहिती नागपूरचे महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी या बसेसचा वापर केला जाणार आहे. तसेच अरुंद गल्ली व दाट वस्तीतील भागात मतदान साहित्य पोहोचवण्यासाठी 26 लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 260 वाहने झोनल अधिकाऱयांना देण्यात येणार आहेत. ईव्हीएम मतदान केंद्रापर्यंत नेणाऱ्या आणि मतमोजणी केंद्रापर्यंत आणणाऱया वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या 48 तासांच्या कालावधीत उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.






























































