अभियंत्यांना अखेर मिळाली बढती, अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे मोठे यश

गेल्या दोन वर्षांपासून अग्निशमन दलातील 53 दुय्यम अभियंत्यांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशामक व यंत्रचालक यांच्या दुय्यम अधिकारी पदांच्या पदोन्नतीच्या जागा जवळपास दोन वर्षांपासून रखडलेल्या होत्या. यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने अतिरिक्त आयुक्त सैनी, उप आयुक्त वित्त प्रशांत गायकवाड, उप आयुक्त गांधी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली पाच वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करून तीन वर्षे केली. यामुळे 53 दुय्यम अधिकाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला. यासाठी प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांची मोठी मदत झाली.