
परदेशात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. चालू वर्षात परदेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 550 शेतकऱ्यांनी 483.1 हेक्टर क्षेत्राची नोंदणी कृषी विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे द्राक्ष निर्यातीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा राज्यात नाशिक, सांगली, सोलापूर, नगरनंतर पाचवा क्रमांक लागतो.
मागासलेला जिल्हा, निती आयोगाच्या आकांशीत जिल्ह्यामध्ये असणारा जिल्हा अशी धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. आजही जिल्ह्यामध्ये शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी आहे. त्यातही पारंपरीक पध्दतीने, पारंपरीक पिके घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या मोठी आहे. मात्र, आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीही वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. सध्या धाराशिव जिल्ह्यात द्राक्ष बागांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यातही परदेशात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
चालू वर्षात परदेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे जिल्ह्यातील तब्बल 550 शेतकऱ्यांनी आपल्या 483.1 हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे. यात तुळजापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 449 शेतकऱ्यांनी तर धाराशिव तालुक्यातील 55 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असून जिल्ह्यातील द्राक्ष हे मोठय़ा प्रमाणात युरोपीय देशांना निर्यात केले जातात.
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी, वडगाव (काटी), पिंपळा खुर्द, सावरगाव, माळुंब्रा, गंजेवाडीसह परिसर हा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक भाग म्हणून उदयास येत आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणात तरुणवर्ग नोकरीच्या मागे न लागता अशा आधुनिक शेतीकडे वळतो आहे. या भागात द्राक्षाच्या विविध जातीचे उत्पादन घेतले जाते. तसेच धाराशिव तालुक्यातील कोडगाव, खानापूरसह परिसरात द्राक्ष उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते.
2020-21 मध्ये जिल्ह्यातून 491 मेट्रीक टन द्राक्ष निर्यात
मागील हंगामात म्हणजेच 2020 -21 या वर्षात जिल्ह्यातून 491 मेट्रीक टन द्राक्ष परदेशात निर्यात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये हे द्राक्ष निर्यात करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 391 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे आपल्या द्राक्ष बागेची नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात 113 शेतकऱ्यांनी 373.85 हेक्टर क्षेत्रावर उत्पादीत 491 मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात केली होती.
सध्याच्या खराब हवामानामुळे द्राक्ष फवारणीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. ढगाळ हवामान, थंडी व पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षाची फुगवण कमी होवून गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. द्राक्षाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्यास द्राक्ष निर्यात करण्यास अडथळा येऊ शकतो.
– त्रिंबक आप्पाराव फंड, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, जळकोटवाडी
जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसाठी ग्रेपनेट बरोबरच आंबा, भाजीपाला निर्यातीसाठी मँगोनेट, व्हेजनेट या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.
– अभिमन्यू काशीद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, धाराशिव



























































