
कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकल्यामुळे गेल्या सहा वर्षांत मुंबई पोलीस दलातील 58 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी 53 अधिकारी पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहेत.
पोलीस अधिकारी कुठल्या न कुठल्या प्रकरणात अडकतात. संबंधितांनी गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. वर्ष 2020पासून ऑक्टोबर 2025पर्यंत मुंबई पोलीस दलातील 58 अधिकारी गंभीर प्रकरणात सापडल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यात 31 उपनिरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 13 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर यापैकी 53 अधिकाऱ्यांना सेवेत पुन्हा रुजू करण्यात आले आहे.
पोलिसांनी 39 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला
नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण तयारीला लागला असताना मुंबई पोलिसांनी 176 नागरिकांना आज सुखद धक्का दिला. परिमंडळ-8मधील पोलिसांनी हरविलेला किंवा चोरीला गेलेला ऐवज शोधून काढत त्या मूळ मालकांना परत केला. तब्बल 39 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत करण्याची कामगिरी फत्ते केली. परिमंडळ-8 अंतर्गत येणाऱया बीकेसी, सहार, विलेपार्ले, वाकोला, खेरवाडी, निर्मल नगर व विमानतळ या पोलीस ठाण्यात मोबाईल, दागिने, वाहनचोरी तसेच हरविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी शोध घेत तब्बल 176 ऐवज शोधून मूळ मालकांना परत केले. त्यात 168 मोबाईल, गाडय़ा, दागिने, रोकड, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे.
जिओ कन्व्हेंशन सेंटरमधून एक लाखाची बेडशीट चोरली
वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित प्रदर्शनात ठेवलेली एक लाख रुपये किमतीची बेडशीट चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे फेस्टिव्हल ऑफ आर्किटेक्ट अॅण्ड इंटेरियर डिझायनर हे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनात दिल्लीस्थित स्प्रेड फर्निशिंग या पंपनीच्या महागडय़ा बेडशीट आणण्यात आल्या होत्या. त्या बेडशीटपैकी एक बेडशीट चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. तब्बल एक लाख रुपये किमतीची ती बेडशीट असल्याने जिओ कन्व्हेंशन सेंटरमधून ती चोरीला गेलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.































































