रायगडात कमी वजनाची 598 बालके झाली गुटगुटीत; अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार

रायगड जिल्ह्यातील कमी वजनाची तब्बल 598 बालके गुटगुटीत झाली आहेत. जिल्हा रुग्णालयात स्थापन केलेल्या नवजात बालक कक्षात डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने केलेल्या उपचारामुळे या बालकांची प्रकृती सुधारली आहे. व्हिटॅमिन सी, जेण्टयामिसीन, व्हॅनकोमायसिन, सेफेपाईम यांसह अन्य औषधे या बालकांना देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचा धोका टाळला असून त्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात एकूण 3 हजार 205 मुले जन्माला आली. यामध्ये 1 हजार 681 मुले तर 1 हजार 524 मुली जन्माला आल्या. यापैकी 598 मुले ही कमी वजनाची जन्माला आली होती. कमी वजनाच्या एकूण 598 बालकांवर वर्षभरात डॉक्टरांनी नवजात बालक कक्षात उपचार केले होते. यामध्ये दीड किलो, एक किलोपेक्षा कमी वजनाची बालके उपचार घेत होती. वजन कमी असलेल्या बालकांचे वजन वाढणे आवश्यक असते. अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. त्यामुळे अशा बालकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मेटून गायत्री म्हात्रे, सहाय्यक मेट्रन अनिता भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात बालक कक्षात असलेल्या डॉ. सागर खेदू, परिचारिका सुजाता पाटील, शीतल राऊत या कक्षातील आरोग्य कर्मचारी यांच्या विशेष प्रयत्नामुळे 598 मुलांचे वजन वाढून त्यांना गुटगुटीत करण्यात यश आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्ष तयार करण्यात आला आहे. नवजात बालकाच्या आरोग्याची काळजी या कक्षातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी योग्य पद्धतीने घेत असल्याने बालकांचे कमी वजन असूनही त्यांना गुटगुटीत केले जात आहे.
– डॉ. शीतल जोशी, (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय)