
सामना प्रतिनिधी । नागपूर
भंडारा जिल्ह्यातील साकोली ते लांखादूर मार्गावर काळय़ापिवळय़ा जीपचा टायर फुटल्यामुळे आज दुपारी हा भीषण अपघात झाला. भरधाव काळीपिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये पाच विद्यार्थिनी व एका महिलेचा समावेश आहे. यात दोन सख्ख्या बहिणीनांही आपला जीव गमावावा लागला. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर मंगळवारी दुपारी 3.30 वाजता घडला. मृतांमध्ये चार विद्यार्थिनी असून बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या.
मृतकांची नावे अशी शीतल सुरेश राऊत (12), अश्विनी सुरेश राऊत (22), शिल्पा श्रीरंग कावळे (20), शारदा गजानन गोटफोडे (45), सुरेखा देवाजी कुंभरे (20), गुनगुन हितेश पालांदुरकर (15), तर वंदना अभिमन सतीमेश्राम (50), डिंपल श्रीरंग कावळे (18), अभिमन तातोबा सतीमेश्राम (45), शुभम नंदलाल पातोळे (20), विणा हितेश पालांदूरकर (30), सिद्धी हितेश पालांदुरकर (5)आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (65)अशी जखमींची नावे आहेत. यापैकी वंदना, डिंपल व शुभमची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.




























































