कुडाळ विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान

741
फोटो प्रातिनिधिक

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी अंतिम टप्प्यात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मतदानाच्या उत्साहावर विरजण पडले. या मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60 टक्के एवढे मतदान झाले. मतदानाची आकडेवारी अद्ययावत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सरासरी 62 ते 63 टक्के मतदान होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी दिली. या मतदारसंघातून शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासह सात उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गुरूवारी कुडाळ तहसीलदार कार्यालय नजीकच्या महिला व बाल रूग्णालयाच्या इमारतीत मतमोजणी पार पडणार आहे.

कुडाळ मतदारसंघात 277 मतदान केंद्रे असून 2 लाख 15 हजार 840 एवढे मतदार आहेत. कुडाळ तालुक्यात 156 मतदान केंद्रांमधून तर मालवण तालुक्यातील 121 मतदान केंद्रांमधून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कुडाळ मतदारसंघात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी काहीसे संथ गतीने मतदान होत होते. अकरा वाजेनंतर मतदान प्रक्रियेने वेग घेतला. मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. कुडाळ हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेसह सुरक्षेबाबत आढावा घेत आवश्यक त्या सुचना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. कुडाळचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.दिलिप पांढरपट्टे यांनीही कुडाळमधील काही मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला. तालुक्यात कुडाळ कविलकाटे येथील सखी केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. दुपार नंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच सायंकाळी 5 वाजेपासून पावसाने हजेरी लावली.

आपली प्रतिक्रिया द्या