मालवणात सरासरी 60 टक्के मतदान; मतदानाचा टक्का घटला

597

कुडाळ-मालवण मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेत मालवण तालुक्यात मतदारांचा ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. दिवसभरात मालवण शहरात मतदारांचा उत्साह कमी होता. ग्रामीण भागात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का शहराच्या तुलनेत जास्त होता. शहरातील दांडी, वायरी या किनारपट्टी भागात मतदानाचा टक्का बऱ्यापैकी दिसून आला. तर काही केंद्रांवर मतदारांचा निरुत्साह दिसून आला.

सकाळी सात वाजल्यापासुन तालुक्यातील 121 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात नऊ वाजेपर्यंत शहरासह तालुक्यातील मतदान केंद्रावर सरासरी 3 ते 4 टक्केच मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत काही मतदान केंद्रावर 18 तर काही मतदान केंद्रावर 23 टक्के मतदान झाले होते. शहरासह तालुक्यातील काही मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. वृद्ध तसेच दिव्यांगांसाठी काही मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यात काही ठिकाणी अशा कोणत्याही सुविधा नसल्याने वृद्ध तसेच दिव्यांगांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मतदानासाठी दिव्यांगांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, याची कार्यवाही झाली नाही. शहरातील दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा कोठे केली आहे याची माहिती न दिल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. मतदान केंद्राच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी काही ठिकाणी स्वयंसेवकही नसल्याने अपंग सेवा संस्थेचे सत्यम पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या