
शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात यावे, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिले होते, परंतु त्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांनी जोरदार विरोध केल्याने या प्रक्रियेला सरकारने स्थगिती दिली आहे.
शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे झाल्यास 25 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे. त्यामुळे ही समायोजन प्रक्रिया थांबवावी आणि 2025-26 चा सेवकसंच मंजूर झाल्यावर ती राबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने लावून धरली होती. ती मान्य करत तसे पत्रक शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी काढले. याबद्दल तानाजी माने आणि शिवनाथ दराडे यांनी शिक्षण आयुक्तांचे आभार मानले.

























































