
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर साई मंदिर खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यांत 64 लाख भाविकांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत येत असतात. दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध असल्याने साईदर्शन घेता येत नव्हते. आता मात्र शिर्डीत भाविकांचा मोठा ओघ वाढला आहे. साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साईभक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले असून, ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर, 64 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले आहे. लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले होते. परंतु कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर साईमंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने देशभरातील साईभक्त शिर्डीत येत आहेत.


























































