
आगामी काळात एआय हेच सर्वकाही असणार आहे. याची झलक आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाहायला मिळत आहे. गुगल, मेटा, ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या चार टेक कंपन्यांनी 2026 मध्ये तब्बल 650 अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती ब्लूमबर्गच्या एका अहवालातून समोर आली आहे.
या रकमेतील अब्जावधी डॉलरचा हिस्सा थेट एआय इन्फ्रास्टक्चरवर खर्च केला जाणार आहे. यामध्ये मोठे डेटा सेंटर, हाय-अँड सर्व्हर, नेटवार्ंकग उपकरण आणि खास चिप्सचा समावेश असेल. जे चॅटबॉट, इमेज जनरेटर आणि इंटरप्रायजेश एआय टूल्सला संचालित करतात. यामध्ये सर्वात जास्त खर्च ऍमेझॉनकडून केला जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एडब्ल्यूएस क्लाऊड प्लॅटफॉर्मवर एआय क्षमतेची मागणी वेगाने वाढत आहे. तर गुगलही एआय आणि क्लाऊड इन्फ्रास्टक्चरला भविष्यातील केंद्र म्हटले जात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सुद्धा कम्युटिंग पॉवर वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. ऍमेझॉनने नुकतेच 30 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. त्यानंतर कंपनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एआयसाठी गुंतवणूक करत आहे. मेटाने मेटावर्स आणि व्हर्च्युअल रिऑलिटीमधील काम कमी करत एआयवर फोकस केला.
कोणती कंपनी किती खर्च करणार
गुगलचे अल्फाबेट 2026 मध्ये 175 ते 185 अब्ज डॉलर एआयवर खर्च करणार आहे. तर ऍमेझॉन 200 अब्ज डॉलरची एआयमध्ये गुंतवणूक करणार आहे. मेटाने 2026 साठी 115 ते 135 अब्ज डॉलर खर्च करण्याचे ठरवले आहे. मायक्रोसॉफ्ट सुद्धा या कंपन्यांच्या मागे नाही. मायक्रोसॉफ्ट 120 अब्ज डॉलरची गुंतवणूक एआयमध्ये करणार आहे.





























































