
मासे विक्रेत्याने होलसेल व्यापाऱ्याला देण्यासाठी आणलेली 7 लाखांची रोकड चोरट्याने दुचाकीसह चोरून नेली. ही घटना शनिवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील आनंदनगर चौकाजवळ घडली. याप्रकरणी अमोल परदेशी (वय 44, रा. नानापेठ) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मासेविक्री व्यवसायिक असून नानापेठेत राहायला आहेत. शनिवारी सकाळी होलसेल व्यापाऱ्याला रक्कम देण्यासाठी त्यांनी बँकेतून 7 लाखांची रोकड काढून दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. अमोल मासेविक्रीच्या होलसेल व्यापाऱ्याला रोकड देण्यासाठी कोथरूडमधील सी फूड्स दुकानासमोर दुचाकी पार्क करून थांबले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांची दुचाकी बनावट चाबी वापरत चोरून नेली. त्यामध्ये 7 लाखांची रोकड आणि 30 हजारांची दुचाकी मिळून अशी एकूण 7 लाख 30 हजारांची चोरी चोरट्याने केली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजनुसार तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. यादव यांनी दिली.



























































