
टिटवाळ्यातील एका 21 वर्षीय तरुणीवर सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पाच नराधमांनी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे दोन मैत्रिणींनीच फसवल्यामुळे तरुणीचे शोषण झाले असून टिटवाळा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.
कौटुंबिक वादामुळे 19 मार्च रोजी पीडित तरुणी बल्याणी येथील झिनत आणि शबनम या मैत्रिणींकडे राहायला गेली होती. काही दिवसानंतर तरुणीने घरी जायचे आहे असे सांगितल्यावर झिनत आणि शबनमने तिला गाडीने घरी सोडतो असे सांगितले. यावेळी त्यांनी गुड्डू नावाच्या इसमाला बोलावून घेतले. मात्र पीडितेला घरी नेण्याऐवजी आंबिवलीतील एनआरसी कॉलनीजवळ नेले.
चाळीतील रूम बघू आणि मग घरी जाऊ असे सांगून तिला एका खोलीत नेण्यात आले. त्या खोलीत शबनमने पीडित तरुणीच्या मानेवर नशेचे इंजेक्शन दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. पीडित तरुणी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती रामबाग येथील लियाकत नामक इसमाच्या रेस्ट रूममध्ये होती. पुढे 10 दिवस ती अर्धशुद्ध अवस्थेत होती. तिला सातत्याने नशेचे इंजेक्शन दिले जात होते. झिनत, शबनम, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली इराणी आणि एक अनोळखी इसम दारू पाजून वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते.
कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन शोषण 3 मे रोजी रात्री शुद्ध आल्यावर पीडितेने स्वतःला एका कुलूपबंद खोलीत बंद केलेले पाहिले. जोरजोराने ओरडल्यावर बाहेरून जात असलेल्या एका व्यक्तीने कुलूप तोडून तिची सुटका केली आणि घरी सोडले. तू याबाबत कुठे वाच्यता केलीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन पीडितेचे शोषण केले जात होते. याच दडपणाखाली काही दिवस पीडित तरुणी होती. अखेर धाडसाने तिने पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली.