विशाळगड तोडफोडप्रकरणी 7 जणांचा जामीन फेटाळला

ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणमुक्त मोहिमेत गडाच्या पायथ्याशी गजापूर येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी फोटोमध्ये दिसणाऱ्या सातजणांचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायाधीश ए. पी. गोंधळेकर यांनी फेटाळला, तर उर्वरित 17 संशयितांचा जामीन मंजूर झाला. दि. 15 जुलैपासून हे सर्व संशयित अटकेत होते.

दरम्यान, जामीन फेटाळण्यात आलेले सातजण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.

ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी 14 जुलै 2024 रोजी ‘चलो विशाळगड’चा नारा दिला होता. त्यादिवशी संभाजीराजे कार्यकर्त्यांना घेऊन गडावर पोहोचण्यापूर्वीच या मोहिमेला हिंसक वळण लागले. विशाळगडाच्या पायथ्याशी पाच ते सहा कि.मी. अंतरावर असलेल्या गजापूर तसेच मुसलमानवाडीत अनेक घरे, प्रार्थनास्थळ आणि वाहनांची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे नोंदवत तब्बल 450 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते, तर 24 जणांना अटक करण्यात आली होती.

या संदर्भात आज तीन आठवड्यांनंतर येथील जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश ए. पी. गोंधळेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी चेतन आनंद जाधव (वय 30), ओंकार दादा साबळे (वय 21), सूरज माणिक पाटील (वय 29), आदित्य अविनाश उलपे (वय 29), ओंकार तुकाराम चौगुले (वय 21, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार सुनीलसिंह राजपूत (वय 29, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सिद्धार्थ धोंडिबा कटकधोंड (वय 30, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी जामीन नामंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयितांच्या वतीने ऍड. सागर शिंदे, ऍड. अभिजीत देसाई, ऍड. धनंजय चव्हाण, ऍड. केदार मुनिश्वर यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षामार्फत ऍड. समीर तांबेकर आणि ऍड. पी. जी. जाधव यांनी काम पाहिले.