
सामना ऑनलाईन, मुंबई
दादर पूर्व येथील नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यंदा अमृत महोत्सव सजरा करीत असून यानिमित्ताने ‘चंदनाची देवी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भवानी मातेच्या विविध रूपांचे दर्शन दररोज भाविकांना घडणार आहे. मंडळाच्या 75 व्या वर्षानिमित्त बी.डी.डी. चाळ 1 व 19 चा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.
नवरात्रीमध्ये कोल्हापूरच्या अंबेमातेच्या मंदिरात देवीची विविध रूपे साकारली जातात. त्याचीच प्रतिकृती यंदा भवानी मातेच्या मंदिरात भाविकांना पाहता येणार आहे. पहिल्या दिवशी शृंगेरी शारदा, दुसऱ्या दिवशी शैलपुत्री माता, त्यानंतर श्री लक्ष्मी वेंकटेश बालाजी, पाच अश्वांच्या स्थावर आरूढ असणारी जगदंबा, गजारूढ अंबाबाई, सप्तशृंगी, गरुडवाहिनी वैष्णवी, महिषा सुरमर्दिनी माता अशा देवींच्या विविध रूपांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे संयोजक दत्ता दिवेकर यांनी दिली. जास्तीत जास्त भाविकांनी उत्सव काळात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळ लोके, सहसचिव प्रदीप कदम, प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.
आगमन सोहळय़ात भव्य 75 दिव्यांची रोषणाई
नवरात्र उत्सवाला भव्य स्वरूप देण्यासाठी नायगावचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्याचे काम रमेश डेकोरेटर्समार्फत सुरू आहे. तसेच मंगळवार, 9 ऑक्टोबरला सायं. 5 वाजता देवीचा आगमन सोहळा होणार असून याप्रसंगी अमृत महोत्सवानिमित्त 75 सुवासिनी, भव्यदिव्य अशा 75 दिव्यांनी मातेचे स्वागत करणार आहे.

























































