शिक्षिकेसमोर वर्गातच ओढली ‘इ सिगरेट’, 4 विद्यार्थी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा येथे एका विद्यार्थ्याने वर्गात शिक्षिकेसमोरच इ सिगरेट ओढल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. वरोरा येथील एका शाळेतील प्रकारामुळे शाळा प्रशासनाने इ सिगरेट ओढणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. तर शहरात अफू, चरस, गांजा या अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असून शाळकरी मुलांना व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

वरोरा येथील सेंट अंनेस शाळेतील सातवीच्या वर्गातील एक विद्यार्थ्याच्या पेनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने पेनाची तपासणी केली असता तिला धक्काच बसला. विद्यार्थ्याकडील ती वस्तू पेन नसून ते ‘इ सिगरेट’ (हुक्का पेन) होते. या विद्यार्थ्याच्या चौकशीतून इ सिगरेट ओढणाऱ्या आणखी काही मुलांची नावे समोर आली. त्यामुळे गोंधळलेल्या शिक्षिकेने सदर प्रकाराबाबतची माहिती शाळेच्या प्राचार्यांना दिली. शाळेने विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबाबत पालकांना बोलावून विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.

शहरात नशा करण्यासाठी ‘हुक्का पेन’ विद्यार्यांमध्ये कुतुहुलाचा विषय असल्याने या मुलाने वर्गात हुक्का पेनचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या पेनच्या वरच्या भागात फ्लेवर्ड लिक्विड असून मोबाइल चार्जरद्वारे चार्ज करावे लगते. लिक्विड गरम होऊन त्यातून निघणारा फ्लेवर्ड धूर ओढला जातो. यासाठी लागणाऱ्या लिक्वीडची किंमत 150 रूपये असून या ‘इ सिगरेट’ (हुक्का पेन)ची किंमत 500 रुपयापर्यंत आहे. वरोरा शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा व्यापार होत असताना या सर्व प्रकाराबाबत पोलीस मात्र अनभिज्ञ आहेत. शहरातील या घटनेनंतर पालकवर्गात एकाच खळबळ उडाली आहे. लहान मुलांना फुस लावून त्यांना व्यसनाच्या विळख्यात ढकलणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.