आठ लाख उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये 5 टक्के जागा राखीव 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे आता सुलभ होणार आहे. व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये तसेच खासगी महाविद्यालयांनी आठ लाख रुपये पिंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा राखीव ठेवाव्यात असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई)  दिले आहेत. अशा विद्यार्थ्यांना टय़ूशन फी माफी योजनेचाही लाभ घेता येणार आहे.

‘एआयसीटीई’ने यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांना नोटीसही पाठवली आहे. महाविद्यालयांमधील एकूण उपलब्ध जागांमधूनच या 5 टक्के जागा राखीव असाव्यात असेही ‘एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या अभ्यासक्रमांच्या किमान 50 टक्के जागा भरल्या गेल्या त्या अभ्यासक्रमांसाठी या राखीव जागा असाव्यात असेही ‘एआयसीटीई’ने म्हटले आहे. या राखीव जागा भरल्या गेल्या नाहीत तर त्या इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देता येणार नाहीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

टय़ूशन फी माफी योजनेंतर्गत अशा विद्यार्थ्यांची फक्त शिकवणीची फी माफ केली जाणार आहे. इतर फी त्यांना भरावीच लागणार आहे, असेही ‘एआयसीटीई’ने नोटिसीमध्ये नमूद केले आहे. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रताही इतर प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच राहणार आहे. प्रवेशासाठी गुणवत्ता यादीही या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररीत्या जाहीर करण्याची काळजी महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे. या सवलतीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून ती प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकात समाविष्ट करावी लागणार आहे.