रशियाच्या बॉम्बहल्ल्यात आई गमावली, एकट्या पडलेल्या 8 वर्षांच्या मुलीचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मारियुपोल भागातील पाणीपुरवठा रशियन सैन्याने तोडला आहे. यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या या मुलीला श्वास सोडेपर्यंत पाणी मिळालं नाही. दुर्दैवाची बाब ही आहे की या मुलीच्या आईचा रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला होता. आईचं छत्र हरपल्याने ही मुलगी एकाकी पडली होती. या मुलीचं नाव तान्या असल्याचं कळालं आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सामान्य नागरिकांनाही आपले लक्ष्य केलं आहे. सामान्य नागरिकांचा रशियाने छळ केला असल्याने जगभरातून मानवतावादी रशियाचा निषेध करत आहेत. रशिया सामान्य युक्रेनी नागरिकांचा कसा छळ करत आहे याचं उदाहरण देण्यासाठी युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंको यांनी ट्विटरवरून तान्याचा फोटो शेअर केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा आगडोंब मंगळवारी 13 व्या दिवसांनंतरही सुरूच राहिला. रशियन सैन्याने युक्रेनच्या झायटोमिर आणि चेर्निहाइव्ह येथील तेल डेपोंवर हवाई हल्ले केले. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांची माहिती दिली. दोन्ही देशांमधील चर्चेच्या तिसऱया फेरीतही कोणताही तोडगा निघाला नाही.

रशियन सैन्याच्या हल्ल्यांनंतर तेल डेपोंना भीषण आग लागली. हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी परिसरात मोठा हाहाकार उडाला. काळ्या धुराचे प्रचंड मोठे लोट बाहेर पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

कच्च्या तेलाचे भाव 300 डॉलरवर जातील

रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यास अमेरिकेने बंदी घातली आहे. आता युरोपियन देशही बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अशी बंदी घातली तर कच्च्या तेलाच्या किमती 300 डॉलर प्रतिबॅरलवर जातील. यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा प्रचंड भडका उडेल, अशी धमकी रशियाने दिली आहे.

युद्ध थांबविण्यासाठी रशियाच्या चार अटी

युक्रेनमधील युद्ध थांबवू पण त्यासाठी चार अटी आधी मान्य करा, असा पवित्रा रशियाने घेतला आहे. तिसऱया फेरीच्या चर्चेत रशियाने या अटी ठेवल्या आहेत. ही बैठक सकारात्मक झाल्याचे युक्रेनने मान्य केले असले तरी हल्ले मात्र थांबलेले नाही. आता चर्चेची चौथी फेरी लवकरच होणार आहे, असे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले.