
देशातील आरोग्य क्षेत्राने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 1990 च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्युदरात 80 टक्क्यांची घट झाली आहे. ‘द लॅन्सेट’च्या जागतिक अहवालानुसार, 1990 मध्ये प्रति एक लाख जन्मांमागे 508 असलेला हा दर 2023 मध्ये 116 वर खाली आला आहे.
अहवालात असेही नमूद केले आहे की, जगभरात 1990 च्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशने कमी झाले आहे, तरी प्रगतीचा वेग मंदावला आहे. पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसव सुनिश्चित करण्यासाठी सरकारने राबवलेल्या योजनांना जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. हिंदुस्थानने माता मृत्युदर प्रति लाख जन्मांमागे 70 च्या खाली आणण्याचे ‘शाश्वत विकास ध्येय’ 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार, देशातील हा दर सध्या 88 पर्यंत खाली आला असून लवकरच हिंदुस्थान 70 चा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या 30 वर्षांत भारताने केलेली प्रगती ही जागतिक सरासरीपेक्षा (48 टक्के घट) किती तरी पटीने अधिक आहे.
जगातील 204 देशांपैकी 104 देश अजूनही 70 पेक्षा कमी माता मृत्युदराचे लक्ष्य गाठू शकलेले नाहीत. त्यांच्या तुलनेत हिंदुस्थानाची कामगिरी आशादायी आहे
2023 मध्ये जगभरात एकूण 2.4 लाख मातांचा मृत्यू झाला, म्हणजे प्रति एक लाख जन्मांमागे 190.5 मातांचा मृत्यू झाला. 1990 च्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीयांशने कमी आहे, जेव्हा हा दर 321 होता.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ
मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) ने केलेल्या या अभ्यासानुसार, 2023 मध्ये हिंदुस्थानात एकूण 24,700 माता मृत्यूची नोंद झाली. याच काळात नायजेरियात 32,900, इथियोपियात 11,900 आणि पाकिस्तानात 10,300 माता मृत्यूच्या घटना घडल्या.



























































