
स्वित्झर्लंडमध्ये सोमवारी सकाळी एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली. दक्षिण स्वित्झर्लंडमधील गोपेनस्टीन (Goppenstein) गावाजवळ हिमस्खलनामुळे (Avalanche) ८० प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. ही ट्रेन सकाळी ६:१२ वाजता स्पीझ (Spiez) येथून सुटली होती आणि ब्रिगच्या (Brig) दिशेने जात होती. स्टॉकग्राबेन (Stockgraben) परिसरात अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे ट्रेनचे डबे रुळावरून खाली उतरले. स्विस रेल्वे कंपनी ‘BLS’ च्या प्रवक्त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सकाळी १० वाजेपर्यंत बाधित डब्यांमधून सुमारे ३० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मदतकार्य अद्याप सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे गोपेनस्टीन आणि ब्रिग दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील वाहतूक किमान मंगळवारपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.


























































