80 हजार डॉलर्सचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, क्रिप्टो करन्सीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात खटाव तालुक्यातील चितळी येथे युवकाला अडवून त्याचे अपहरण करत त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब चोरत त्याद्वारे 80 हजार डॉलर हिंदुस्थानी चलनानुसार 64 लाखांवर दरोडा टाकणाऱया 9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सातारा पोलिसांना यश आले. दरोडा व सायबरच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषणने केली आहे.

किरण गुलाब गावीत (वय 32, रा. विद्यानगर, कराड), बिरजू उर्फ सतीश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय 38, रा. शांतीनगर, इचलकरंजी), विशाल उर्फ सागर हरिभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय 29, रा. सोमंथळी, ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे (वय 31, रा. निपाणी, कर्नाटक), अभिजित सुरेश खंडागळे (वय 35, रा. राधानगरी, कोल्हापूर, सध्या रा. निपाणी), प्रवीण बाळासो शेवाळे (वय 26, रा. घोगाव, ता. कराड), बाळू तुकाराम भोसले (वय 31, रा. इचलकरंजी), किशोर अंबादास निलंगे (वय 27, रा. शहापूर, इचलकरंजी), विशाल आनंदा शेवाळे (वय 30, रा. मलकापूर, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील काही संशयित गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी ऋषीकेश राजेंद्र शेटे (रा. उंब्रज, कराड) यांनी वडूज पोलिसांत तक्रार दिलेली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी माहिती दिली. तक्रारदार ऋषीकेश शेटे व त्यांच्या भावाचा क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगचा मुख्य व्यवसाय आहे. 19 डिसेंबरला ऋषीकेश कारमधून आटपाटी येथून उंब्रजकडे येताना चितळीत आरोपींनी त्यांना अडवले. ऋषीकेश यांना मारहाण करत पुसेसावळी गावच्या हद्दीत सोडून दिले.ऋषीकेश यांनी स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर घरी येऊन ते व्यवसाय करत असलेल्या क्रिप्टो करन्सीचा व्हॅलेट युजर आयडी व पासवर्ड टाकून पाहिले असता त्यांना धक्का बसला. कारण त्यांच्या त्या खात्यावरील 80 हजार डॉलर हे संशयित आरोपींनी दुसऱया व्हॅलेटवर ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली.