6 ते 14 वयोगटातील 8,143 बालके शिक्षणाविना; ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरात प्रमाण अधिक , 17 ते 31 ऑगस्ट शिक्षण विभागाची पुन्हा शोधमोहीम

 

राज्यात 6 ते 14 वयोगटातील 8 हजार 143 बालके शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने एप्रिल 2023 मध्ये केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात समोर आले होते. मात्र यांपैकी किती बालके पुन्हा शाळेत दाखल झाली आहेत, ही बालके नियमित शाळेत हजेरी लावतात का, त्यांची शैक्षणिक प्रगती कशी सुरू आहे याविषयी कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. आता गुरुवार, 17 ऑगस्टपासून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा राज्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. 31 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे.

 जिल्हानिहाय शाळाबाह्य बालके

नगर 113, अकोला 340, अमरावती 198, छत्रपती संभाजीनगर 800, भंडारा 17, बीड 153, बुलढाणा 64, चंद्रपूर 13, धुळे 472, गडचिरोली 35, गोंदिया 80, हिंगोली 78, जळगाव 401, जालना 100, कोल्हापूर 69, लातूर 11, मुंबई उपनगर 652, मुंबई शहर 491, नागपूर 110, नांदेड 19, नंदुरबार 249, नाशिक 380, धाराशीव 25, पालघर 309, परभणी 121, पुणे 817, रायगड 174, रत्नागिरी 45, सांगली 91, सातारा 40, सिंधुदुर्ग 45, सोलापूर 67, ठाणे 1401, वर्धा 34, वाशीम 48, यवतमाळ 81.

शाळाबाह्य शोधमोहिमेत सापडलेली बालके केवळ शाळेत दाखल होऊन हजेरीपत्रकावर त्यांचे नाव चढविले जाते. या बालकांना दररोज हजर करून घेण्याचे कोणतेही बंधन शाळांवर नाही. आरटीईमध्ये या बालकांसाठी विशेष तरतूद असून या बालकांना लिहिता-वाचता येण्यासाठी शाळांनी त्यांच्यावर विशेष मेहनत घेणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नसल्याने या मोहिमेचे गांभीर्यच आता उरलेले नाही.

हेरंब कुलकर्णीशिक्षणतज्ञ