
चैत्री यात्रेत जोतिबा डोंगरावर चोरी करणाऱया 83 चोरटय़ांना पोलिसांनी पकडले आहे. त्यानंतर अंबाबाई मंदिरात रथोत्सवातही दोन लाखांच्या दागिन्यांवर चेरटय़ांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा जोतिबाची चैत्री यात्रा लाखोंच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यात्रेसाठी तब्बल आठ लाखांहून अधिक भाविक डोंगरावर आल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. मोठय़ा संख्येने भाविक येऊनही यात्रा शांततेत पार पडली.
यात्रेत गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱया तब्बल 83 चोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या 83पैकी 47 संशयितांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत आणि 32 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पार पडलेल्या अंबाबाईच्या रथोत्सवात मोठय़ा प्रमाणावर भाविक दाखल झाले होते. मंदिर परिसरात रस्ते अरुंद असल्याने, तसेच भाविकांची संख्या प्रचंड असल्याने या गर्दीचा फायदा घेत चोरटय़ांनी दोन लाख 15 हजारांच्या दागिन्यांवर हात साफ केला. महिलांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद जुना राजवाडा पोलिसांकडे करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरटय़ांचा शोध सुरू करण्यात आला. भाविकांच्या आनंदाला चोरटय़ांमुळे गालबोट लागले.



























































