
एसटी महामंडळाने 23 मार्चपासून बंद असलेल्या आपल्या बससेवेचा प्रारंभ गुरूवार सकाळपासून सुरू केला. या सेवांना हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी तसेच सातारा, नाशिक, अलिबाग अशा मध्यम व लांबपल्ल्याच्या सेवानी प्रारंभ करण्यात आला आहे.
मुंबई सेंट्रलहून सकाळी 8.30 वाजता मुंबई ते चिपळूण ही पहिलीच गाडी अवघ्या सहा प्रवाशांच्या उपस्थिती सुरू सोडण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत मुंबई व ठाण्यातून पाच शिवनेरी बसेस पुण्याला रवाना झाल्या. पुण्याहून मुंबईला दुपारपर्यंत एक शिवनेरी बस आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारने एका बसेसमधून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पन्नास टक्के प्रवासी क्षमतेसह या बसेस चालविण्यात येत आहेत. दुपारी दोन पर्यंत राज्यभरात 721 बसेसद्वारे 800 फेऱया झाल्या होत्या. दुपारी 4 वाजेपर्यंत 840 बसेसद्वारे 1090 फेऱया करण्यात आल्या. मुंबईतील प्रमुख स्थानकांतून सातारा, नाशिक, अलिबाग, चिपळूण अशा फेऱया सोडण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली. प्रवाशांची मागणी आणि उपलब्धतेनूसार एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. बसेस सोडण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. बसेसमध्ये प्रवाशांना शारीरिक अंतर राखून एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसना ई -पासची गरज नसली तरी प्रत्येक प्रवाशाने मास्क परीधान करणे बंधककारक आहे.




























































