
सीमाशुल्क विभागाने उरणच्या इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल या (आयसीटीपीएल-ग्लोबिकॉन) सीएफएस प्रकल्पावर दंडात्मक कारवाईऐवजी थेट लायसन्सच रद्द केले आहे. यामुळे कंपनीचे कामकाज तीन महिन्यांपासून ठप्प असून ८५० भूमिपुत्र कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे संतप्त कामगारांनी जेएनपीएच्या सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोप्रोली-खोपटा येथील आयसीटीपीएल-ग्लोबिकॉन सीएफएसमध्ये आलेला एक संशयायीत कंटेनर २९ मार्च २०२६ रोजी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्कॅनिंगनंतर ‘होल्ड कंटेनर बे’ मध्ये ठेवला होता. तपासणीनंतर ‘जिप्सम प्लास्टर’च्या नावाखाली कंटेनरमध्ये प्रतिबंधित फटाके आढळले होते. विशेष म्हणजे स्कॅनिंगचा आदेश न पाहताच डीआरआयच्या ताब्यातील फटाक्याचा हा कंटेनर सीएफएलमधून बाहेर काढण्यात आला. मात्र डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत हा कंटेनर पुन्हा ताब्यात घेतला. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने कंपनीच्या संशयीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करत 13 एप्रिल रोजी आयसीटीपीएल-ग्लोबिकॉन कंपनीचा आयात निर्यातीचा परवानाच रद्द केला. त्यामुळे कंपनीचे कामकाज ठप्प असून कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
























































