907 कलाकार मोदींच्या समर्थनार्थ उतरले मैदानात; मजबूर नको, मजबूत सरकार आणा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्याला मजबूर सरकार नको, मजबूत सरकार आणायचे आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने केलेली कामगिरी उत्तम असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन  देशाला दिले आहे. दहशतवादाचा सामनाही निर्भीडपणे केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकारच सत्तेवर आणा. या सरकारच्या बाजूनेच मतदान करा, असे आवाहन तब्बल 907 कलाकारांनी मतदारांना केले आहे. हे कलाकार मोदींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. आपल्या आवाहनातून त्यांनी मजबूर सरकार म्हणजेच काँग्रेसला मतदान करू नका, असेही म्हटले आहे.

भाजपच्या बाजूने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणाऱया मतदारांमध्ये विवेक ओबेरॉय, अनुराधा पौडवाल, कोईना मित्रा, पायल रहतोगी, राहुल रॉय, आलोक नाथ यांसारख्या बडय़ा कलाकारांच्या सह्या असलेले पत्र जारी करण्यात आले आहे. प्रत्येकाला आपले सरकार  निवडण्याचा अधिकार असून कुठल्याही दबावाखाली येऊन मतदान करू नका, असे आवाहनही या कलाकारांनी केले आहे. दरम्यान, या आधी 600 कलाकारांनी भाजप सरकारने कलाकारांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा आरोप करत भाजपला मतदान करू नका असे आवाहन मतदारांना केले होते. नसिरुद्दीन शाह, कोंकणा सेन-शर्मा, अनुराग कश्यप, रत्ना पाठक-शाह, अमोल पालेकर, अरुंधती नाग, आस्ताद देबू, आर्शिया सत्तार, दानिष हुसैन, गिरीश कर्नाड, एम. के. रैना, कविता लंकेश, लिलीट दुबे, मल्लिका तनेजा आणि नवतेज जोहर या कलाकार आणि साहित्यिकांचा यात समावेश होता. देशाची घटना वाचवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष देशासाठी हे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या निमित्ताने कलाकारांचे दोन गट पडल्याचे समोर आले आहे.

मुक्त जगणे, गाणे, नृत्य संकटात

या आधी ज्या 600 कलाकारांनी मोदी सरकारला विरोध केला होता त्या कलाकारांनी आज प्रत्येक कलाकाराचे मुक्त जगणे, गाणे आणि नृत्य संकटात सापडले असून प्रत्येकजण भीतीच्या छायेखाली जगतो आहे. सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमतच उरलेली नाही. स्वातंत्र्य उपभोगणाऱया हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट असल्याचा आरोप केला होता.

मराठी लेखक, प्रकाशकांचे योग्य सरकार निवडण्याचे आवाहन

साहित्यिक, विचारवंतांना होत असलेल्या जीव घेण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठी लेखक, प्रकाशकांनी मतदारांना ‘व्यर्थ न हो मतदान’ या पत्रिकेद्वारे योग्य आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदान करूया, असे आवाहन मतदारांना केले होते. भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, राजीव नाईक, येशू पाटील, प्रदीप चंपानेरकर, अरुण खोपकर, रंगनाथ पठारे, रत्नाकर मतकरी, हरी नरके, आशीष पाथरे, प्रशांत पवार आदी लेखक आणि प्रकाशकांनी मतदारांना आवाहन केले होते.