धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात 92 उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक 31 उमेदवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघात असून त्या खालोखाल धाराशिवमध्ये 23, उमरगा विधानसभा मतदारसंघात 21 तर भूम-परंडा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

धाराशिव जिल्ह्यात धाराशिवसह तुळजापूर, उमरगा व भूम – परंडा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. धाराशिव मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये महायुतीच्या वतीने शिवसेनेचे कैलास पाटील, आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर, बहुजन वंचित आघाडीकडून धनंजय शिंगाडे यांच्यासह रामजीवन बोंदर, नेताजी गोरे यांच्यासह इतर 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील, आघाडीच्या वतीने काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक जगदाळे, प्रहार संघटनेच्या वतीने महेंद्र धुरगुडे यांच्यासह इतर 27 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर उमरगा मतदारसंघात महायुतीच्या वतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, आघाडीच्या वतीने काँग्रेसचे दिलीप भालेराव, वंचितच्या वतीने रमाकांत गायकवाड, मनसेच्या वतीने जालींदर कोकणे यांच्यासह इतर 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भूम – परंडा मतदारसंघात महायुतीच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना उपनेते प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे, जनता दलाकडून अ‍ॅड. रेवण भोसले, अपक्ष म्हणून कॅप्टन संकेत चेडे यांच्यासह इतर 13 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.