
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात कोणतीही जातीय दंगल झाली नसल्याचा दावा केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी २ जुलै रोजी केला होता. तसेच सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वांचा विकास केल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांचा हा दावा गृहमंत्रालयानेच फोल ठरवला आहे. मोदी सरकारच्या काळात एकूण दोन हजार ९२० दंगली झाल्या असून त्यात तीन मोठय़ा जातीय दंगली असल्याचे गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१७ पर्यंत एकूण दोन हजार ९२० दंगली झाल्या. त्यात ३८९ जण ठार झाले, तर ८ हजार ८९० जण जखमी झाले होते. पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिह्यात २०१७मध्ये झालेली बदुरिया-बशीरहाट दंगल, २०१६मधील हाजीनंगर दंगल आणि २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर दंगल या तीन मोठय़ा दंगली मोदी सरकारच्या काळात घडल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ’फॅक्ट चेकर डॉट इन’ ने म्हटले आहे. तर २०१५मध्ये एकही मोठी जातीय दंगल झाली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.




























































