
आता हिंदुस्थानी नागरिकांना परदेशात प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. 96 देशांनी हिंदुस्थानाच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला परस्पर मान्यता देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. मांडविया म्हणाले की, ”हिंदुस्थानी सरकार जगातील सर्वात मोठ्या कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना मान्यता देण्यासाठी उर्वरित जगाच्या संपर्कात आहे. जेणेकरून ते शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटनाच्या उद्देशाने मुक्तपणे जगभरात प्रवास करू शकतील.”
मांडविया म्हणाले, सध्या 96 देशांनी हिंदुस्थानी लसीकरण प्रमाणपत्रांना परस्पर मान्यता देण्याचे मान्य केले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या देशांमधून सतत प्रवास करणाऱ्या लोकांना 20 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही सूट देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना परदेशात प्रवास करायचा आहे, ते ‘कोविन’ पोर्टलवरून आंतरराष्ट्रीय प्रवास लसीकरण प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात.
हिंदुस्थानी लसीकरण प्रमाणपत्रांना परस्पर मान्यता देण्यास सहमती दर्शविलेल्या 96 देशांमध्ये कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, आयर्लंड, नेदरलँड, स्पेन, बांगलादेश, फिनलंड, माली, घाना, सिएरा लिओन, नायजेरिया, सर्बिया, पोलंड, स्लोव्हाक रिपब्लिक, क्रोएशिया, बल्गेरिया, तुर्की, झेक प्रजासत्ताक, स्वित्झर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रिया, रशिया, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार इत्यादी देशांचा समावेश आहे.
109 कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले पूर्ण
देशात आतापर्यंत 109 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यात 74,21,62,940 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 34,86,53,416 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.





























































