काँग्रेसकडून वंचितला 96 जागांची ऑफर,आंबेडकरांना मात्र अमान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीसाठी वंचितकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली गेली असताना आता काँग्रेसकडून निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. 96 जागा काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी 96 तर वंचितसह तिसऱ्या आघाडीसाठी 96 जागांची ऑफर देण्यात आली आहे. मात्र ही ऑफर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून धुडकावण्यात आली आहे.

आघाडीचं गणित जुळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकांमागून बैठका झडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तिसऱ्या आघाडीसाठी 96 जागांचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही कळविण्यात आलं.  मात्र त्यांनी ही ऑफर साफ नाकारल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीत मित्र पक्षांसह वंचितला 96 जागा देण्याचा फॉर्म्युला आंबेडकरांना मान्य नाही.  मित्र पक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या कोटय़ातील जागा द्याव्यात, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

जागांसाठी घासाघीस

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी बाहेरचा मार्ग धरला आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होईपर्यंत आणखी किती आमदार बाहेरचा रस्ता धरतात याबाबत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अद्याप खात्री नाही. त्यामुळे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ या पक्षांवर येणार आहे. ही बाब ओळखूनच अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आंबेडकरांचे प्रयत्न सुरू आहेत.