तामिळनाडूचे 981 नागरिक राज्यात परतले; जावयासारखी सरबराई ठेवल्याची भावना केली व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे 48 दिवस पंढरपूरमध्ये अडकून पडलेल्या तामिळनाडूतील 981 भाविक, विद्यार्थी आणि कामगारांना शनिवारी विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. सासुरवाडीत जावयाची जशी सरबराई ठेवली जाते, तशी आमची व्यवस्था केल्याची भावना तामिळनाडूच्या नागरिकांनी व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. कोरोना रोखण्यासाठी अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने हे तामिळनाडूतील नागरिक गोंधळले होते. मात्र, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यांनी यांच्याशी संवाद साधून त्यांना पंढरपूरमध्येच राहण्याची विनंती केली होती.

मंदिर समितीचे भक्त निवास आणि अन्य दोन मठामध्ये या सर्व नागरिकांची सोय करण्यात आली होती. अगदी ट्युथपेस्ट पासून ते दोनवेळच्या जेवणापर्यतची चोख व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला गावी जायचे आहे अशी मागणी जोर धरत नव्हती. 4 मे रोजी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या. त्यासाठी 22 डब्यांची विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेत या प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले. पंढरपूर ते तिरुचिरापल्ली अशी ही रेल्वे धावणार आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता ही गाडी पंढरपूरहून निघाली असून रविवारी दुपारी तिरुचिरापल्लीला पोहचणार आहे. गेले 48 दिवस पंढरपूरकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर जाताना अनेकांचे डोळे पाणावले होते. आमच्याकडे जावयाचा एवढा पाहुणचार होत नाही, तेवढी सरबराई आणि बडदास्त स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही येथील सुविधेकडे लक्ष ठेवले होते. ढोले दररोज कँपला भेट देऊन चौकशी करीत होते. ढोले यांनी या नागरिकांची काळजी घेत चांगली व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ढोले यांच्याबरोबर सेल्फी काढला. या नागरिकांना निरोप देण्यासाठी पंढरपूरचे डीवायएसपी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, रेल्वे प्रबंधक जे. पी. चनगौड, निरीक्षक ए. के. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.