
सामना प्रतिनिधी। मालवण
तब्बल सतरा तास वीज पुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी रात्री शहरातील देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी चिडलेल्या नागरिकांनी एका कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केली तसेच देऊळवाडा व कुंभारमाठ येथील वीज उपकेंद्रात तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर अन्य एका संशयिताचा शोध सुरू आहे.
चौके येथे मुख्य वीजवाहिन्या तुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान शहरातील काही भागात वीज पुरवठा पूर्ववत झाला तर अन्य ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिक चिडले होते.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट व्यावसायिकांची तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे नागरिक वैतागले होते. त्यातच शहरात पूर्ववत झालेला वीजपुरवठा रात्री साडे दहा वाजण्याचा दरम्यान पूर्णतः खंडित झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. यामुळे शहरातील विविध भागातील नागरिकांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली.
संतप्त जमावातील काही जणांनी या कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्या तसेच दूरध्वनीची केबल तोडून टाकली. याच दरम्यान कुंभारमाठ येथील वीज उपकेंद्राच्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी गर्दी केली. याठिकाणीही काचा फोडून नुकसान करण्यात आले. वीज पुरवठा खंडित झाल्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून महावितरणचे कनिष्ठ अभियंता मंदार सावंत यांना मारहाण झाली. याप्रकरणी आज महावितरणच्या अधिकार्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात कुंभारमाठ येथील विनोद भोगावकर या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य एका संशयिताचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली.




























































