
सामना प्रतिनिधी । भीमाशंकर
घोडनदी तीरावरील देवीचे दर्शन घेण्यापूर्वी नदीत हातपाय घुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आणि मुलगा पाय घसरून नदीत वाहून गेले. आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे आज सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, वाहून गेलेल्या तिघांपैकी दोन मुलींचे मृतदेह सापडले असून, मुलाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज भोसले यांनी दिली.
तेजल विकास हुले (वय १९), अंकिता अनिल बोऱ्हाडे (वय १९) आणि प्रज्ज्वल विकास हुले (वय १४) अशी नदीत वाहून गेलेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी तेजल आणि अंकिताचा मृतदेह सापडला.
आंबेगाव तालुक्यातील नारिडी येथील तेजल आणि प्रज्ज्वल हे बहीण-भाऊ शिणोली येथील मावशीकडे सुटीसाठी आले होते. दुपारी मावशीची मुलगी अंकिता बोऱ्हाडे हिच्यासोबत डिंभे धरणावर फिरण्यासाठी गेले होते. तेथून सायंकाळी शिनोली येथील देवीच्या दर्शनासाठी घोड नदीवर गेले. दर्शन घेण्यापूर्वी तिघेही हातपाय धुण्यासाठी घोड नदीवर गेले. तेथे तिघेही पाय घसरून पाण्यात पडले आणि वाहून गेले. यात अंकिता बोऱ्हाडे आणि तेजल हुले या दोघींचे मृतदेह सापडले असून, प्रज्ज्वलचा शोध सुरू आहे.































































