राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) चा दीक्षान्त समारंभ उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए)१३४ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज उत्साहात पार पडला. यावेळी ३३६ कॅडेट्सना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयाची (जेएनयू) पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आयपी विपीन, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, प्रबोधिनीचे प्राध्यापक, कॅडेट्सचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे चीफ ऑफ स्टाफ कमिटी लेफ्टनंट जनरल सतीशकुमार दुआ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोह पार पडला. या समारंभात विज्ञान शाखेतील ८१, संगणक विज्ञान शाखेतील १९१ आणि कला शाखेतील ६४ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. हिंदुस्थानशी मैत्रिपूर्ण संबंध असलेल्या देशांतील ८ कॅडेट्सनाही यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी लेफ्टनंट जनरल दुआ म्हणाले, देशाला कुशाग्र आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेसोबत अद्ययावत तंत्रज्ञानाचा सहज वापर करू शकणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्ही स्कॉलर वॉरियर होण्यासाठी प्रयत्न करा. शास्त्र विभागात पहिल्या क्रमांक पटकावणाऱ्या जी. के. रेड्डी याला जनरल के. सुंदरजी यांचा नावाने देण्यात येणारी, तर सुरेंद्रसिंग बिष्ट याला संगणकशास्त्र विभागात अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल अ‍ॅडमिरल सुरेश मेहता यांच्या नावाची ट्राफी देण्यात आली. सामाजिक शास्त्रे विभागात प्रथम स्थान पटकावणाऱ्या आणि मूळचा मुंबईकर असणाऱ्या मित्तल प्रजापतीने एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांच्या नावाने देण्यात येणारी ट्रॉफी पटकावली.

मी मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. माझे वडील गेल्या २६ वर्षांपासून लष्कराच्या सिग्नल विभागात सुभेदार आहेत. मी एअर फोर्स विंगचा असल्याने फायटर पायलट होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. – कॅडेट जी. के. रेड्डी

‘मी मूळचा उत्तराखंडचा असून माझे सर्व शिक्षण गाझियाबाद येथे झाले. कुटुंबाला लष्कराची पाश्र्वभूमी नसल्याने सुरुवातीला मला जुळवून घेण्यास त्रास झाला. मात्र, येथे रुळल्यावर हेच माझे दुसरे घर झाले. लष्करात कमांडो म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.- कॅडेट सुरेंद्रसिंग बिष्ट

मी मुंबईचा असून माझे वडील टेलरिंग व्यवसाय करतात, तर माझी आई गृहिणी आहे. ११वीला असताना मला एनडीएबाबत मला मित्रांकडून माहिती मिळाली. कुठलाही क्लास न लावता मी तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. मात्र, निवड झाल्यानंतर त्यांचा विचार बदलला. आज मी जे काही आहे त्याचा त्यांना अभिमान आहे. माझा लहान भाऊसुद्धा आता एनडीएमध्ये येण्यास उत्सुक आहे. – कॅडेट मित्तल प्रजापती

श्वास रोखणारी प्रात्यक्षिके
लष्कर आणि हवाईदलाच्या चार सारंग हेलीकाप्टरने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना श्वास रोखून धरण्यास भाग पाडले. सारंग टीमने इन्स्पायर्ड थ्रू एक्सलन्स या संकल्पनेवर आधारित चित्तथरारक प्रात्यक्षिके करताना अवकाशात भराऱ्या घेत निरनिराळ्या रेखाकृती तयार केल्या. गनिमी कावा पद्धतीने शत्रूवर केवळ कुकरीच्या साह्याने तुटून पडणे, वेगवान अश्वावर स्वार होत भाल्याने अचूक निशाणा साधणे, शारीरिक आणि मानसिक कणखरतेची अत्युच्च कसोटी पाहणारे मार्शल आर्ट यांसारख्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित भारावून गेले.