जिवलग…स्विटीताई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर

अभिनेता अजिंक्य जोशी… त्याच्या तीन मुलींपैकी मोठी स्विटी… ही त्याची मोठी लेक बंगळूरूहून त्याच्याकडे आली….

आई शप्पथ, तू करतेयस हा रोल? मज्जा…’ खूप दिवसांनी हा मस्तीखोर मुलगा सेटवर भेटला आणि एकत्र काम करायचा योग पुन्हा एकदा जुळून आला… खरं तर याआधी एकत्र खूप काम केलं नसल्याने अजिंक्यकडे पेट आहे हे माहीतही नव्हतं. पण जेव्हा कळलं तेव्हा ‘करूया ना आर्टिकल…’ आणि पुढच्या क्षणाला बस क्या म्हणून स्वीटी प्रकरण सुरू झालं.

खरं तर आजपर्यंत आपण विविध व्यक्तिरेखांमधून पाहिलेला अजिंक्य जोशी आणि स्विटीचा बाबा अजिंक्य जोशी यात इतका फरक आहे…

‘आमची स्विटी आमच्याकडे आल्या बंगलोरवरून… आमच्या बाबांच्या मित्रांनी गिफ्ट केलं. त्यांनी फ्लाईटमध्ये बसवलं. आम्ही अत्यंत उत्साहात एअरपोर्टवर तिला रिसिव्ह करायला गेलो. फ्लाईट आलं, पण स्विटी आलीच नाही… आम्ही फुल फ्रस्टेट… घाबरलो… चिडलो… पळापळ झाली… बापरे चुकून कुणी दुसऱयाने घेतलं नाही ना… विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितलं की, प्राण्यांची ट्रान्सफर ज्या कार्गोमधून होते त्या पद्धतीचं विमान नसल्याने स्विटी ३  तासांनी येणाऱया पुढच्या फ्लाईटने येणारे… आम्ही तसेच परत घरी. पुन्हा 3 तासांनी एअरपोर्टवर एक्झिट गेटला वाट बघतात ना तसे अत्यंत आतुरतेने आमच्या या बाळाची वाट बघत बसलो होतो. एका छोटय़ाशा केजमधून आमच्या छबुडीचं आगमन झालं. फायनली आणि जोशी परिवार खूश… काय करू आणि कुठे ठेवू असं झालं होतं यार… पण अगदी पहिलाच एक्सिप्रियन्स असल्याने सगळे भांबावलेले होते घरी. अरे काहीतरी खायला प्यायला घेऊन जा रे बाळाला… इति आमची आई.

सांभाळून आणा रे… छोटं आहे ते… शी-शूचं बघा जरा आधी… इति आमचे बाबा. आई गं… विमान प्रवासाने थकून येईल आमचं इवलंसं पिल्लू… इति आमचे शेजारी एक. कशाला हवं पेट बिट… कोण आहे घरी पाहायला… इति आमचे शेजारी दोन. अशा अनेकांची अनेक म्हणणी सोबत घेऊन फायनली त्या एवढय़ाशा त्या पिलाला हातात घेतलं तेव्हा रडायलाच यायला लागलं गं… आनंदानं अर्थात… आणि हेच सेम फिलिंग पहिल्यांदा माझ्या हातात घेतल्यावर आलं होतं. तर… बाईंना प्रवासाचा जेटलॅग झाला होता. बंगळुरू-मुंबई… खरं तर प्राण्यांचं बाय एअर ट्रान्सफर होतं तेव्हा त्यांना सेडेटीनेस होतोच. जसा हळूहळू उतरला तसा गाडीतच ती ऑक्टिव्ह व्हायला लागली. तिला आणलेलं दूध घटाघटा प्यायला लागली. मग जरा तिला बरं वाटलं. जान में जान आ गई… अशा रीतीने तिला घरी घेऊन आलो. किंबहुना मॅडमचं आमच्या घरी आगमन झालं. रीतसर जोशी स्टाईलने ओवाळून, औक्षण करून तिचं प्रेमाने आगमन झालं. हातात घेतल्या घेतल्या आई म्हणाली, कित्ती स्वीट आहे नं स्विटी… अगदी इतकाच विचार न करता तिचं नाव ठेवलंय. नावाप्रमाणेच आमची स्विटी खूपच गोड

आली तशी लग्गेच ती नाही रुळली घरात… तिला आम्हाला ऍक्सेप्ट करायला जरा वेळ लागला. छोटंसं ते बाळ इकडेतिकडे करायचंच… पण वावरण्यात अजून हक्क आला नव्हता. तिचं खेळणं, बागडणं कंफर्टेबल वाटत नव्हतं. जेवत नव्हती नीट… आम्हाला कळत नव्हतं काय करावं. किंवा आमचं काही चुकतंय का… तिला बरं वाटत नाहीय का? डॉक्टरकडे नेऊन आणलं. तर एव्हरीथींग वॉज ओके… मग का बरं शांतपणे तिच्याशी… प्रेमाने पापा घेतला, भरवलं. तेव्हा खाल्लं पोटभर… मग जरा तिच्यात बदल जाणवायला लागला. बाबा (माझे) रोज तिला भरवायचे. तेव्हाच ती खायची. तर तिला लाड करून हवे होते. आपलेपणा, प्रेम हवं होतं. खूप… आता बाबांनी भरवावं म्हणून हट्ट करायला लागली. हळूहळू डिमांड करायला लागली. जबरदस्ती…

बाबासुद्धा प्रेमाने भरवायचे. हळूहळू त्यांनी भरवल्याशिवाय जेवेच ना… ती सवय बंद केली. तिला स्वतःच्या हाताने जेवायला शिकवलं. तिच्यासाठी घरात छोटीशी खुर्ची बनवलीय. त्यावर तिचा बेड तयार केला. जेवलं की त्यावर जाऊन मस्त ती झोपते. आराम करते. तिला असं काही ट्रेनर ठेवून ट्रेनिंग वगैरे दिलेलं नाहीय. आम्हीच आमच्या पद्धतीने तिला शिकवलंय. शिकवतो. कधी ऐकते, कधी अक्षरशः धुडकावून लावते. बट इटस् ओके… तिच्यावर कुठलीही जबरदस्ती आम्ही करत नाही. हां… अति आगाऊपणा केला तर जसं माझ्या मुलींना ओरडतो, दोन चापटय़ा देतो, तसं स्विटीलासुद्धा बसते एखादी… मग रुसून तिच्या त्या खुर्चीवर जाऊन बसते. आणि थोडय़ा वेळाने ओरडलंय बिरडलोय विसरून पुन्हा येऊन अंगावर उडय़ा प्रकार सुरू… स्विटी घरात सगळ्यांचीच लाडकी आहे. आता ९ वर्षांची झाल्याने वयोमानाप्रमाणे थोडी थकलीय. पण घरात कुणीही आलं तर प्रेमाने भुंकून, मग धावत जाऊन त्याच्या पायात घुटमळून त्याचं स्वागत करणार…

मीसुद्धा शूटिंग करून कितीही दमून आलेलो असलो तरी स्विटी आली की सगळी दमछाक, थकवा ऍक्चुअली पळून जातो. माझ्या मुलींच्याही आधी स्विटी धावत येऊन मला भेटते. क्या बात है यार… क्या फिलिंग है… आणि हे खरं तर ज्यांच्याकडे पेट आहे त्यांनाच कळेल. माझ्या मुलींचा जीव की प्राण आहे स्विटी… अभ्यास तर कधी जन्मात करून देत नाही त्यांना… आणि त्यांनाही नसतोच करायचा तो मुळात. त्यांनी पुस्तक काढलं की ही त्यांच्या पुस्तकावर, दफ्तरावर… मांडीवर… परीक्षा असताना रूमचं दार बंद करून घेते. खरं तर मुलांना शाळेसाठी उठवणं हा डेंजर कार्यक्रम असतो. पण आम्हाला नाही बाबा तसं वाटत… स्विटी जा ताईला उठव बरं… असं म्हणायची खोटी, की मॅडम बेडवर… आणि आमच्या मुलींना चाटून चाटून उठवणार. मग ना शाळेला लेट, ना ब्रेकफास्टला बुट्टी…

स्विटू आजारी अशी नाही पडली. पण अशक्त झाली होती. तेव्हा दोन सलाईनच्या बॉटल्स चढवल्या होत्या. तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना कसं औषध द्यायचं. इंजेक्शन द्यायचं. सलाईन द्यायचं. अगदी आपण घेतो तशीच ट्रीटमेंट… क्षणभर वाटलं की सगळंच आपल्यासारखं… फक्त बोलता येत नाही म्हणून त्याला प्राणी म्हणायचं. नाही यार… स्विटी आमच्या घरातली मोठी मुलगी आहे. आमची पेट बिट नाही. कुत्री म्हटलं तर फटकेच देईन… माझी मोठी मुलगी… आईबाबांची लाडावलेली नात… माझ्या मुलींची प्रेमळ आणि मस्तीखोर ताई… आणि मेरे दिल का अविभाज्य तुकडा…

आमचा झोरो आणि अजिंक्यची स्विटी यांची प्लेडेट करायची ठरलीय आता आमच्या सेटवर… आई शप्पथ मज्जा येणारय… एक लॅबरेडॉर आणि एका शित्झूची मस्ती बघताना…