
सामना ऑनलाईन । मुंबई
बॅलार्ड पिअर येथील सिंधिया हाऊसला शुक्रवारी सायंकाळी लागलेली आग शमते न् शमते तोच रे रोड येथील लेदर कंपनीला आग लागून त्यात कंपनी जळून खाक झाली. या घटनेत एकजण जखमी झाला असून त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत या कंपनीतील लेदरने पेट घेतल्याने घटनास्थळी आगडोंब उसळला. त्यामुळे प्रथम ४ वाजून ४० मिनिटांनी नंबर-२ लेव्हलची व ५ वाजून ४९ मिनिटांनी लेव्हल-३ ची आग घोषित करण्यात आली. ज्वाळा व धुरामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठा अडथळा निर्माण झाला. अथक प्रयत्नांनंतर या आगीवर सकाळी ८.३० वाजता नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, बॅलार्ड पिअर येथील सिंधिया हाऊस इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेली आग तब्बल १२ तासांनंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले, मात्र या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.



























































