ओबीसींसह सर्वांचीच जातीनिहाय जनगणना करा, आठवलेंची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

‘केवळ ओबीसी जातीची जनगणना नको, तर सर्वच जातींची जातीनिहाय जनगणना व्हायला हवी म्हणजे प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे स्पष्टपणे समोर येईल यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत’, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. रिपाइंचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी आठवले पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या प्रसंगी आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, किर्तीपाल सर्वगोड, आबासाहेब देठणकर, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, महादेव भालेराव, अशोक सरवदे, आतिश हाडमोडे, रामभाऊ गायकवाड, दीपक चंदनशिवे, अर्जुन मागाडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन टप्प्यात शिष्यवृत्ती द्यावी

‘समाजकल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते, ते एकाच वेळी न देता ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि मार्च-एप्रिल अशा दोन टप्प्यात देण्यात यावी. शिवाय शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याविषयी विचारविनियम सुरू आहे. जे विद्यार्थी अनुतीर्ण होतात त्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अपंग विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा’, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.